Prashant Kishor Congress : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेस पक्षात सहभागी होतील आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय असेल, याचा निर्णय पक्षात्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) घेणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी या प्रकरणी ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, तसंच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्या अंतिम निर्णय घेतील. प्रियंका गांधी आणि पक्षाच्या अन्य जेष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी तीन दिवसांमद्ये दुसऱ्यांदा भेट घेतली होती. राहुल गांधी मात्र यात सहभागी नव्हते.
“आम्ही या प्रकरणी अंतिम निर्णय हा सोनिया गांधी यांच्यावर सोडला आहे. त्यांनी यापूर्वीच यासंदर्भात चर्चा केली आहे. प्रशांत किशोर पक्षात येतील का, त्यांची भूमिका काय असेल? विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी रणनिती तयार करण्यात पक्षाचा साथ देतील याबाबत त्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करू याबाबत अंतिम निर्णय घेतील.” असं काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं. काँग्रेसच्या एका पॅनेलला प्रशांत किशोर यांच्या योजनेवर चर्चा करण्यास आणि पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आठवडाभरात अवगत करण्यास सांगितले आहे.
अशा बैठका पुढील काही दिवस सुरू राहणार आहेत, तसंच विचारविनिमयानंतर पक्ष प्रशांत किशोर यांच्या पक्षातील प्रवेशाबाबत घोषणा करू शकतो. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीतील विजयात रणनितीकार म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान, काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये स्वबळावर लढायला हवं, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात त्यांनी आघाडी केली पाहिजे, असं प्रशांत किशोर यांनी सूचवलं असल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं