उत्तर प्रदेशात काँग्रेस, सपा आणि रालोद यांची आघाडी?; रणनीतीवर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 06:50 AM2021-10-23T06:50:41+5:302021-10-23T06:51:50+5:30
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, रालोद नेते जयंत चौधरी यांच्याशी काँग्रेस संपर्कात आहे. सध्या रालोद आणि सपामध्ये आघाडी आहे. दिल्लीहून लखनौला विमानातून जाताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आगामी निवडणुकीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे सपा, काँग्रेस आणि रालोदच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या लखनौ मुक्कामी असून पूर्व उत्तर प्रदेशात किमान शंभर जागांवर मजबूत उमेदवार उतरविण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. महिलांना ४० टक्के तिकिटे देण्याची घोषणा करतानाच विद्यार्थिनींना मोबाइल आणि स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे.
पक्ष शेतकऱ्यांसोबत
प्रियांका गांधी यांच्या निर्देशावरून पंजाब आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने लखीमपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आणि पत्रकार यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन काँग्रेसने हे सिद्ध केले आहे की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत उभा आहे.