लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 820 कोटी रुपयांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 01:55 PM2019-11-09T13:55:52+5:302019-11-09T14:31:19+5:30
31ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला खर्चाचा तपशील देण्यात आला आहे.
मुंबई : नोट बंदीनंतर देशातील राजकीय पक्षांना मिळणारा फंड कामी झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र अशात ही काँग्रेसने 2019 च्या लोकसभा व सोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि सिक्कीम या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 820 कोटी रुपये खर्च केले आहे. तर गेल्यावेळीपेक्षा यावेळी काँग्रेसचा खर्चाचा आकडा वाढल्याचा पाहायला मिळाला.
काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक आणि पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 820 रुपयांचा खर्च केला आहे. ज्यात 626.3 कोटी रुपये पक्षाच्या प्रचारासाठी तर 193.9 कोटी रुपये उमेदवारांवर खर्च करण्यात आले असल्याचे काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे. 31ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला खर्चाचा तपशील देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गेल्यावेळी 2014 मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवर 516 कोटी रुपये खर्च केले होते.त्यामुळे यावेळी काँग्रेसचा खर्च वाढला असल्याचे पाहायला मिळाले. गेल्यावेळी पेक्षा 300कोटी अधिक खर्च करूनही, देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला फक्त 8 जागा यावेळी अधिक वाढवता आले आहे.
भाजपकडून मात्र अजूनही खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला नाही. मात्र गेल्यावेळी 2014 ला झालेल्या निवडणुकीत भाजपने 714 कोटी रुपये खर्च केला होता. त्यामुळे यावेळी भाजपचा खर्च हा गेल्यावेळीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.