नवी दिल्ली: चीनवरभारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने सोमवारी आणखी 47 चीनी अॅप्सवर बंदी घातली. याआधी भारताने चीनचे 59 अॅप्स बॅन केले होते. या अॅप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीनंतर भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत त्यांच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती. तसेच आता सरकारची नजर 275 चिनी अॅप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG ऑनलाईन व्हिडिओ गेम अॅपचा देखील समावेश आहे.
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अॅप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र यावर काँग्रेसने आता निशाणा साधला आहे. खरंतर मोदी सरकारला पबजी या ऑनलाईन व्हिडिओ गेम अॅपवर बंदी आणायची होती, पण मग तरुण गेम खेळायचं थांबले तर बेरोजगारीबद्दल बोलतील अशी भीती मोदी सरकारला आहे, असा उपरोधिक टोला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी लगावला आहे. अभिषेक मनु सिंघवी ट्विट करत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पबजीवर खरोखरच बंदी घालायची इच्छा होती. पण त्यांना समजले की कल्पनारम्य आभासी जगापासून विचलित केले तर तरुण खऱ्याखुऱ्या जगाबद्दल बोलायला लागतील. देशातील तरुण जॉब्ससारख्या वास्तविक जगाच्या गोष्टी विचारतील. त्यामुळे समस्या मोदी सरकारपुढे समस्या निर्माण होतील, असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स भारत सरकारने आधीच बॅन केले आहेत. आता सरकारची नजर 275 चिनी अॅप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG चाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एका अधिकृत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिनी अॅप्ससंदर्भात माहिती गोळा केली जात असून त्यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तसेच यासर्व अॅप्सना फंडिंग कुठून मिळतं, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत आहे. यापैकी काही अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं समोर आलं आहे, तर काही अॅप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान, लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरु करण्यात आली होती. चीनचे 59 अॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश होता. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.