नवी दिल्ली : आपल्या पक्ष प्रवक्त्यांना कोणत्याही वृत्तवाहिनीवर बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. लोकसभा निवडणुकांतील पराभव आणि त्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडण्याचा राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर चुकीच्या पद्धतीने बाजू मांडली जाऊ नये वा प्रवक्त्याच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजीवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच देशातील वृत्तवाहिन्यांनी व संपादकांनी चर्चेच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पक्ष प्रवक्ते वा प्रतिनिधींना बोलावू नये, अशी विनंतीही काँग्रेसने केली आहे. तूर्त एका महिन्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काही नेत्यांविषयी केलेली विधाने तशीच्या तशी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे बोलले जाते.
राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनीही आपले राजीनामे पक्षनेतृत्वाकडे पाठवले आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये, असा आग्रह सर्वच नेते करीत आहेत. त्यासाठी नेत्यांनी तयार केलेला फॉर्म्युलाही राहुल यांनी फेटाळून लावला आहे. गेल्या तीन दिवसांत ते कोणाही नेत्याला भेटलेले नाहीत वा फोनवर बोललेले नाहीत. राहुल यांच्या राजीनाम्याचा विषय कसा हाताळायचा, याविषयी काँग्रेस नेतेच गोंधळात आहेत.
अशा वेळी काँग्रेसचे प्रवक्ते वा प्रतिनिधींनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत चुकीची वा गैरसमज निर्माण करणारी विधाने केल्यास गोंधळात भर पडू शकते. ते टाळण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. राहुल यांनी किमान काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत अध्यक्षपद सोडू नये, असा नेत्यांचा आग्रह आहे. पक्षसंघटनेत हवे ते बदल करता यावेत, यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने सर्वाधिकार मिळावेत, अशी नेते व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवाय राहुल गांधी यांनीच लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करावे, अशीही नेत्यांची इच्छा आहे.राहुल यांच्यासाठी धरणे, मोर्चेमात्र राहुल गांधी या सर्व बाबींविषयी बोलण्यात तयार नाहीत. ते स्वत: बोलायला तयार नसताना काँग्रेसचे प्रतिनिधी व प्रवक्ते यांनीही वृत्तवाहिन्यांवर जाऊ न काही बोलू नये, असा पक्षाचा निर्णय असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा, असा सर्व राज्यांतील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आग्रह आहे. कार्यकर्ते ठिकठिकाणी उपोषण करीत आहेत, धरणे धरत आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी चेन्नई व पुडुच्चेरीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चेही काढले.