नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्त्या डॉली शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉली शर्मा यांच्यावर आपल्या सासूचे घर कब्जा केल्याचा आरोप आहे. डॉली शर्मा यांच्या सासू पुष्पा शर्मा यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉली शर्मा यांच्याशिवाय अन्य २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉली शर्मा यांच्या सासूचे घर वैशाली, गाझियाबाद येथे आहे.
पुष्पा शर्मा यांनी ९ फेब्रुवारी रोजी पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार, डॉली शर्मा या त्यांचे लिंक रोडवरील घर हिसकावून घेऊ इच्छित आहेत. डॉली शर्मांच्या सासूने आपल्या सुनेवर जबरदस्तीने घरात घुसून आपल्या ताबा घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र, डॉली शर्मा यांनी जबरदस्तीने घरात घुसल्याचा आरोप फेटाळून लावला असून ही कौटुंबिक बाब असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७८ वर्षीय पुष्पा शर्मा यांनी डॉली शर्मा यांच्यावर गार्डला बंदुकीचा धाक दाखवून घरात घुसल्याचा आरोप केला आहे. तसेच, सासूने सांगितले की, ९ फेब्रुवारीला डॉली शर्मा आणि इतर २० लोक घरात घुसले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत डॉली शर्मा यांनी सासूकडून घराच्या चाव्या हिसकावून तिला फेकून दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, डॉली शर्मा यांच्या सासूनेही यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयाने दिला होता 'हा' आदेश पुष्पा शर्मा यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारीला गाझियाबाद सत्र न्यायालयाने डॉली शर्मा आणि पती दीपक शर्मा यांना परवानगीशिवाय घरात प्रवेश करू नये, असे सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉली शर्मा यांनी घरात घुसून मला माझ्याच मालमत्तेतून बेदखल केले. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली.