नवी दिल्ली- फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी नुकतीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एनसीसबद्दल माहिती नसण्यावरून टीका केली. "राहुल गांधीजी हे काय चालले आहे. तुम्ही जे सांगत आहात त्याच्या उलट तुमची टीम काम करत आहे. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचंच अॅप डिलीट केलं आहे. आता आपण तंत्रज्ञानाचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आपला डेटा सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये का पाठवते. जिथून हा डेटा कोणताही टॉम, डिक किंवा अॅनॅलिटिका मिळवू शकते, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती.
फेसबूक युजरच्या डेटाचा राजकीय हेतूंसाठी उपयोग केला जातो आहे असं म्हणताना त्यांनी एका परकीय कंपनीचं नाव घेतलं. याच उत्तर म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी स्मृती इराणींचा एका जुना व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे. ट्विटर यूजर @Joydas ने हा व्हिडीओ आधी शेअर केला. तो व्हिडीओ संजय झा यांनी रिट्विट केला आहे. स्मृती इराणी यांनी काही वर्षांपूर्वी शेखर सुमनच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्मृती इराणी या कार्यक्रमात गेल्या होत्या. त्या कार्यक्रमात शेखर सुमन यांनी स्मृती इराणी यांना भाजपाची संबंधीत प्रश्न विचारले. भाजपाबद्दल तुमचं ज्ञान किती आहे? याची आम्हाला माहिती करून घ्यायची आहे, असं शेखर सुमन यांनी म्हंटलं. भारतात एकुण किती राज्यं आहेत? असा प्रश्न शेखर सुमन यांनी विचारला. त्या प्रश्नावर 'मला माहिती नाही', असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं. भाजपाची किती राज्यात सरकार आहे? असा प्रश्न शेखर सुमन यांनी विचारल्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, 'माझ्या माहितीनुसार एकुण तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. बाकी मला माहिती नाही'. त्यावर शेखर सुमन यांनी स्मृती इराणींची चूक सुधारत एकुण 7 राज्यात भाजपाची सरकार असल्याचं सांगितलं.