नवी दिल्ली: काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव त्यागी यांच्या निधनाची माहिती काँग्रेसकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये राजीव त्यागी यांच्या आकस्मित निधनाने आम्ही सर्वजण दु:खी आहोत. ते एक कट्टर काँग्रेस नेते आणि खरे देशभक्त होते, असे म्हटले आहे.
राजीव त्यागी हे आपले मत उघडपणे मांडणे आणि भाष्य करण्यासाठी मीडियात ओळखले जात होते. टीव्ही चॅनलच्या चर्चेत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि राजीव त्यागी यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत असे. तसेच, चर्चेदरम्यान आपले मुद्दे पुराव्यासह मांडणे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्यासाठी राजीव त्यागी हे ओळखले जात होते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी राजीव त्यागी यांची उत्तर प्रदेशचे मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.
राजीव त्यागी हे काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय होते. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे अकाली निधन माझ्यासाठी वैयक्तिक दु: ख आहे. राजीव एक समर्पित योद्धा होते, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपाचे प्रवक्त संबित पात्रा यांनीही राजीव त्यागी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.