नवी दिल्ली - काँग्रेसची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला एका वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका पत्रकार परिषदेत भाजपावर टीका करताना सीता मातेचं वस्त्रहरण असा उल्लेख केला. त्यावरून आता भाजपाने आक्रमक होत काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला प्रसारमाध्यमांसमोर भाजपावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारख्या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप करत होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाऐवजी सीतामातेचं वस्त्रहरण असं विधान केलं.
सुरजेवाला म्हणाले की, भाजपाचा गेल्या निवडणुकीत दारुण पराभव झालेला आहे. लोकशाही, कायदा आणि नैतिकतेचा विजय होईल. जसे की एकेकाळी सीता मातेचं वस्त्रहरण झालं होतं. त्याप्रमाणे हे लोक लोकशाहीचं करू पाहत आहेत. असे लोक पराभूत होतील. त्यांचं पितळ उघडं पडेल, असं सुरजेवाला म्हणाले.
खरंतर काँग्रेसच्या प्रवक्त्यांना महाभारतामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या घटनेचा उल्लेख करायचा होता. मात्र त्यांच्या तोंडातून चुकून सीतामातेचं वस्त्रहरण असा उल्लेख झाला. हल्लीच नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे कोंडी झालेल्या भाजपाला सुरजेवाला यांच्या विधानामुळे संधी मिळाली. भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सांगितले की, ही काही जीभ घसरण्याची घटना नाही आहे. ते जानवेधारी हिंदू असल्याचा दावा करतात. मात्र ते रामाच्या संस्कृतीऐवजी रोम संस्कृतीवर विश्वास ठेवतात.