आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून ते 72 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपा नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस असल्याचं म्हटलं जात आहे. दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनावरुन काँग्रेसने नरेंद्र मोदींची (Narendra Modi) खिल्ली उडवली आहे,
भाजपाने सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची आठवण करुन देत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी (Congress Srinivas BV) यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. राष्ट्रीय बेरोजगार दिवस असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं असून गेल्या दीड वर्षात सरकारकडून केवळ 10 लाख नोकऱ्या देण्यात आल्याचं काँग्रेसने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"अदानीऐवजी तरुणांकडेही लक्ष दिले असतं तर बरं झालं असतं"
"पंतप्रधानांचा वाढदिवस #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस म्हणून साजरा करायची कोणत्याही तरुणाला हौस नाही. पण तरुणांना खोटी स्वप्ने दाखवून तरुण भारताला बेरोजगार करणारे नरेंद्र मोदी हे इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत. अदानीऐवजी तरुणांकडेही लक्ष दिले असतं तर बरं झालं असतं" असं देखील श्रीनिवास बी. वी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नरेंद्र मोदींवर बेरोजगारीवरून जोरदार निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींसहकाँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.' राहुल गांधी हे सध्या केरलमधील करुणागापल्ली येथे आहेत. आज काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाचा 9वा दिवस आहे. राहुल गांधींशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायष्यासाठी प्रार्थना,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.