काँग्रेसने सुरू केली विरोधकांची एकजूट, खरगेंची अनेक नेत्यांशी चर्चा, लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 10:52 AM2023-04-08T10:52:45+5:302023-04-08T10:53:01+5:30
सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने ठाकरेंना दिला शब्द
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरगे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी फोनवर चर्चा केली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आतापर्यंत लहान-मोठ्या एकूण सहा पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. सध्या पंजाबमधील अकाली दल आणि कर्नाटकमधील जेडीएसशी चर्चेसाठी काँग्रेसकडून पुढाकार घेतला जाणार नाही. स्वतंत्र लढू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षावर कोणत्याही प्रकारे दबाव आणला जाणार नाही.
ठाकरेंना दिला शब्द
सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा शब्द दिला आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता सावरकर यांचे नाव घेणार नाहीत. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे की, विरोधकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा.
‘श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब’
२०२२ मध्ये अदानीची संपत्ती ४६ टक्क्यांनी वाढली. ६४ टक्के जीएसटी खालच्या स्तरातून ५० टक्के आला, तर वरच्या १० टक्के लोकांनी फक्त ४ टक्के भरला, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावरून कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात ‘श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब’ होत असल्याचा दावा केला.