शीलेश शर्मा नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मंथन सुरू झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष कोणत्याप्रकारे प्रशांत किशोर यांचा उपयोग करू शकतो यावरून विचारविमर्श सुरू आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहेत. सोनिया गांधी यांनी याबाबत राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. प्रशांत किशोर यांची कोणती भूमिका असू शकते, हा या चर्चेचा मुख्य मुद्दा होता. कारण, पक्षातील एक गट प्रशांत किशोर यांच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार नाही. तसेच, प्रशांत किशोर हेही पक्षाच्या बाहेर राहून काम करण्यास तयार नाहीत.
सोनिया गांधी यांच्यासमोर हाच प्रश्न आहे की, प्रशांत किशोर यांना कोणते पद आणि जबाबदारी दिली जावी. १० जनपथचे सूत्र सांगतात की, यूपीएच्या धर्तीवर भाजपाविरुद्ध एक मोठी आघाडी उभी करण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. जेणेकरून, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष, टीडीपी, सपा यासारखे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आणता येतील. हे पक्षही प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहेत.