भाजपाच्या मुकाबल्यासाठी काँग्रेस आखणार रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:45 AM2018-07-28T03:45:34+5:302018-07-28T03:46:00+5:30
भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा धर्माच्या नावावर धुव्रीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित असून भाजपच्या या रणनीतीचा कसा मुकाबला करायचा, याचा काँग्रेस गांभीर्याने विचार करीत आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठे नेते शकील अहमद यांनी भाजपच्या या रणनीतीवर टिप्पणी करताना म्हटले आहे की, काँग्रेससह देशापुढील हे मोठे आव्हान आहे. भारतात ब्रिटिश ज्या प्रकारे समाजात फूट पाडण्याचे उद्योग करीत होते, त्याचप्रमाणे भाजप फाटाफुटीचे राजकारण करीत आहे. धुव्रीकरण करणे सहज सोपे होईल, या विचाराने भाजपा हिंदूपुढे उभा करता येईल, असा मुस्लिम नेता भाजप शोधत आहे.
भाजपच्या या रणनीतीबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसने तीव्र चिंता व्यक्त केली. या बैठकीला शशी थरूर, पी. चिदंबरम, आनंद शर्मा, पवन खेडा, प्रियंका चतुर्वेदी, राजीव गोडा, रणदीप सुरजेवाला, मीम अफजल, अभिषेक सिंघवी यांच्यासह ४० नेते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीचा मुख्य मुद्दा लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या मुकाबल्यात काँग्रेसची रणनीती कशी असावा, हा होता. काँग्रेस रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित मुद्दे उपस्थित करीत असते; परंतु भाजप धार्मिक मुद्दे उकरुन त्यावर पाणी फेरते, असे मत थरूर यांनी मांडले. २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. तथापि, आम्ही केवळ २५ टक्के क्षमतेने काम करीत आहोत; दुसरीकडे भाजप धुव्रीकरणाचे राजकारण करीत आहे, असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले. यावर पवन खेडा, संजय झा, राजीव त्यागीसह युवा प्रवक्त्यांनी आक्षेप घेतला. आम्ही सातत्याने भाजपच्या मुद्यांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी संघर्ष करीत आहोत. तेव्हा आम्ही युवा प्रवक्ते जे काही म्हणातात त्याचा काहीही परिणाम होत नाही, असे म्हणणे उचित ठरणार नाही, असे मत युवा प्रवक्त्यांनी मांडले.