व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांसोबत समन्वयासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या तीन सदस्यीय समितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांचे नाव या समितीत नाही. लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद के. सुरेश यांनी सांगितले की, अधिवेशनाची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी आगामी काही दिवसांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलविणार आहेत.
लोकसभेत काँग्रेस अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालीच काम करत राहणार की, त्यांच्या जागी नवा चेहरा आणणार हे अद्याप स्पष्ट नाही. के. सुरेश म्हणाले की, लोकसभेतील उपाध्यक्षपद दोन वर्षांपासून रिक्त असून त्यासाठी निवडणूक घेण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवरून अधिवेशन वादळी ठरू शकते. कोरोना संकट, महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन, राफेल व्यवहाराबाबत झालेले गौप्यस्फोट या मुद्यांवरून वातावरण तापू शकते.
निंदाव्यंजक प्रस्ताव आणणार का?कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात केंद्र सरकारला आलेल्या अपयशावरून निंदाव्यंजक प्रस्ताव आणायचा की नाही, हे अद्याप मुख्य विरोधी पक्षाने ठरविलेले नाही. इंधन दरवाढीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.
प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा विजय झाल्यानंतर त्यांच्यासोबतही चांगले संबंध निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस, द्रमूक आणि तृणमूल काँग्रेस यांच्या एकीतून लोकसभेत मजबूत ताकद होऊ शकते. मात्र, याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.