काॅंग्रेसला पुन्हा दणका; १,७४५ कोटींची कर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:27 AM2024-04-01T07:27:06+5:302024-04-01T07:27:31+5:30
Congress News: लोकसभा निवडणूक तोंडावर असताना, आयकर विभागाने काॅंग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०१५-१६ या कालावधीसाठी १,७४५ कोटींचा करभरणा करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना, आयकर विभागाने काॅंग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०१५-१६ या कालावधीसाठी १,७४५ कोटींचा करभरणा करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत आयकर विभागाने काॅंग्रेसला एकूण ३,५६७ कोटींच्या कराची मागणी केली आहे.
राजकीय पक्षांना करसवलत बंद केल्याने त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू करण्यात आला आहे. यापूर्वी शुक्रवारी कर परताव्यातील कथित तफावतीबाबत १८२३.०८ कोटी भरण्यासाठी आयकरने नोटीस बजावली होती.
छापेमारीदरम्यान, काही काॅंग्रेस नेत्यांकडे सापडलेल्या डायरीत ‘तिसऱ्या पक्षांकडून’ मिळालेल्या निधीवरही कर लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आयकर विभागाने यापूर्वी काॅंग्रेसच्या खात्यातून करापोटी १३५ कोटी वसूल केले आहेत. त्याविरोधात काॅंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.