भावी नेते घडविण्यासाठी काँग्रेसचा अभ्यासवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:55 AM2018-05-04T05:55:16+5:302018-05-04T05:55:16+5:30
राहुल गांधी पक्षाध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नवीन प्रयोग सुरु केले आहेत.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राहुल गांधी पक्षाध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नवीन प्रयोग सुरु केले आहेत. रा. स्व. संघ व कम्युनिस्टांनी ज्या पद्धतीने संघटना मजबूत केली त्याच धर्तीवर काँग्रेस आता युवा कार्यकर्त्यांना घडवणार आहे. काँग्रेसची विचारप्रणाली व संस्कृतीची युवा कार्यकर्त्यांना संपूर्ण ओळख करुन देण्यासाठी अभ्यासवर्ग चालविण्याचा उपक्रम या पक्षाने हाती घेतला आहे. काँग्रेसची विचारधारा अंगी बाणविलेल्या या युवा कार्यकर्त्यांतून मग पक्षाचे भावी नेते घडविण्यात येतील.
अभ्यासवर्गाची जबाबदारी एनएसयूआयवर
या अभ्यासवर्गाच्या आयोजनाची जबाबदारी एनएसयूआयवर सोपवली आहे. काँग्रेसमध्ये दुसऱ्या व तिसºया फळीतील उत्तम नेत्यांची उणीव भासत असून त्यावर पक्षाने आजवर गांभीर्याने विचार केला नव्हता. काँग्रेस पक्षात युवा नेते असले तरी वैचारिक स्तरावर त्यांची कामगिरी तितकीशी चांगली नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. विचारशील काँग्रेस कार्यकर्ते व युवा नेते घडविण्यासाठी येत्या ११ जून ते ६ जुलै या कालावधीत एनएसयूआयच्या वतीने चार आठवड्यांचा पब्लिक स्पीकिंग या विषयावरील अभ्यासवर्ग आयोजिण्यात आला आहे. त्यामध्ये ३० वर्षे वयाखालील कोणाही युवकाला प्रवेश दिला जाणार आहे. तो काँग्रेस पक्षाचा सदस्य असायलाच हवा अशी अट घालण्यात आलेली नाही. या अभ्यासवर्गामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाºयांना एनएसयूआयच्या वेबसाइटवर आपल्या नावाची नोंदणी करण्याची करता येईल. धोरणात्मक निर्णय तसे घेतले जातात, देशासमोरील समस्या काय आहेत व त्या कशा सोडविता येऊ शकतात याची माहिती पब्लिक स्पिकिंग कोर्समध्ये देण्यात येईल. प्रत्येक धोरणाच्या मागील राजकारण काय असते अशा अनेक बाबींची ओळख या अभ्यासवर्गामध्ये सहभागी होणाºया युवकांना करुन दिली जाईल़