मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 02:53 PM2024-09-17T14:53:34+5:302024-09-17T14:54:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचुड यांच्या घरी गणपतीची आरती केली होती.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या घरी भगवान श्रीगणेशाची पूजा केली होती. सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजा करण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. त्या सर्व टीकेवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी(दि.17) अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रतिक्रिया दिली.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, आजही समाजात फूट पाडणाऱ्या आणि समाज फोडण्यात गुंतलेल्या सत्तेच्या भुकेल्या लोकांना गणेश पूजनात अडचणी आहेत. मी सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेत सहभागी झालो, म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टीममधील लोकांना त्रास व्हायला लागला. समाजात फूट पाडणाऱ्यांना गणेश उत्सवाचीही अडचण आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा गुन्हा केला. या लोकांनी गणपतीची मूर्तीची तुरुंगात ठेवली. त्या चित्रांनी संपूर्ण देश व्यथित झाला होता. ही द्वेषपूर्ण विचारसरणी समाजात विष पसरवणारी आहे. हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहे. या द्वेषपूर्ण विचारसरणीला आळा घालणे गरजेचे आहे. अशा शक्तींना आपण पुढे जाऊ देऊ नये, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
मोदी पुढे म्हणतात, आपल्या देशासाठी गणेश उत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे. इंग्रज देशाचे तुकडे पाडण्यात व्यस्त होते, जाती-धर्माच्या नावावर देशात फूट पाडली जात होती, तेव्हा गणेशोत्सवाने लोकांना एकत्र बांधून ठेवम्यात महत्त्वाची भूमिका बजावली.