Punjab Election 2022: “पंजाबला पाकिस्तानपेक्षा कॅप्टन अमरिंदर सिंगांकडून अधिक धोका”; काँग्रेसचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 10:44 AM2021-10-21T10:44:42+5:302021-10-21T10:46:36+5:30
Punjab Election 2022: पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे.
चंडीगड:पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. काँग्रेससाठी दिवसेंदिवस परिस्थिती आव्हानात्मक होत चालल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Punjab Election 2022) पार्श्वभूमीवर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून, भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. यातच पंजाबला पाकिस्तानपेक्षा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून अधिक धोका असल्याची घणाघाती टीका पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर केली आहे.
अमरिंदर सिंग यांनी लवकरच स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा करू, असे सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्यास भाजपसोबत जागावाटपाची आशा असल्याचा दावा केला होता. जोपर्यंत मी माझे लोक आणि राज्याचे भविष्य सुरक्षित करत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, असेही ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना, कॅप्टन अमरिंदर सिंग फक्त स्वतःचा, कुटुंबाचा आणि मित्रांचा विचार करतात, असा टोला रंधवा यांनी लगावला.
साडेचार वर्षे पंजाबचा विश्वासघात
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी साडेचार वर्षे पंजाबचा विश्वासघात केला. अमरिंदर सिंग यांनी केवळ स्वतःचाच विचार केला. पंजाबला पाकिस्तानपासून नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या गद्दारीपासून धोका अधिक आहे, असा हल्लाबोल रंधवा यांनी केला आहे. दुसरीकडे, पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांत आपल्यासोबत युती करण्याच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सूचनेचे भाजपने स्वागत केले. सिंग हे देशभक्त असल्याचे सांगून, देशहिताला प्राधान्य देणाऱ्यांशी हातमिळवणी करण्यास आम्ही नेहमीच तयार असल्याचे भाजपने सांगितले.
दरम्यान, अमरिंदर सिंग हे देशभक्त आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याशी युती करण्यास भाजप तयार आहे. सिंग शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत होते. आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. वेळ येईल तेव्हा आम्ही एकत्र बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू, असे भाजप सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनी म्हटले आहे.