नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण, एस जयशंकर, अनुराग ठाकूर, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने देखील पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चीनसंबंधी आपले धोरण देशासमोर मांडावं, असं काँग्रेसने म्हटलं. "विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी मागे घेतील आणि काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेसने सणसणीत टोला लगावला आहे. काँग्रेसने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेच्या आत साडेचार किमी आतमध्ये एक गाव वसवले आहे, अमेरिकेच्या पेंटागॉनने हा रिपोर्ट दिला आहे. चिनी सैन्य सीमा भागात रस्त्यांचं जाळं विणत आहे. तसंच वास्तू आणि ऑप्टिकल फायबर केबलचे नेटवर्क उभारत आहे. यामुळे चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे घेतील आणि चीनवर बोलतील, असं म्हटलं आहे.
"चीनच्या सततच्या कुरापतींवर भारत गप्प"
चीनच्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण सामरिक आणि दृष्ट्या हा भाग महत्त्वाचा आहे. चीनच्या या कुरापतींमुळे सिलिगडुी कोरिडोर धोक्यात आला आहे. गेल्या 18 महिन्यांत चीनने वेगवगेळ्या प्रकारे घुसखोरी केली आहे. गेल्या महिन्यात चीनने पूल तोडला होता, असं देखील काँग्रेस म्हणाली. चीनच्या सततच्या कुरापतींवर भारत गप्प आहे. चीन भूतानशी चर्चा करतोय आणि भारत सरकार गप्प आहे. चीन श्रीलंकेत बंदर काबिज करतो आणि मालदीवमध्ये द्वीप घेतो, तरीही भारत सरकार गप्प आहे.
"चीनला दिलेल्या क्लीन चिटने भारताचे मोठे नुकसान"
चीन ग्वादर बंदल बळकावतो, तरीही भारत गप्प आहे. इतकं सगळं होऊनही भारत सरकार गप्प का आहे? चीनला दिलेली क्लीन चिट भारत मागे का घेत नाही? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. चीनला दिलेल्या क्लीन चिटने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. चीनसोबतचा व्यापार 67 टक्क्यांनी वाढला आहे. देशाच्या शत्रूला लाल डोळे दाखवण्याऐवजी विरोधी आणि पत्रकारांना दाखवले जात आहे, असा टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.