नवी दिल्ली - राजस्थानमध्ये मु्ख्यमंत्री अशोक गहलोत आणि बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यातील लढाई आता कायद्याच्या अंगणात पोहोचली आहे. या प्रकरणावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच राज्यात आमदारांची खरेदी विक्री झाल्याचा आरोप करून त्याचा तपास सुरू झाला आहे.
याबाबतचे काही ऑडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, या ऑडिओमधील आवाज हा केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, गजेंद्र सिंह शेखावत आणि बंडखोर आमदार भंवरलाल यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून राजस्थानमधील गहलोत सरकारने कारवाई करताना गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गेल्या वर्षी काँग्रेसने हाच कायदा रद्द करण्याचे आश्वासन जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले होते. मात्र आता या कायद्यातील तरतुदींचा वापर गहलोत सरकार करत आहे.
आमदारांच्या खरेदीविक्रीचा आरोप भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी काँग्रेसने राजस्थानमधील एसओजींकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी एसओजींनी भादंवि कलम १२४ ए (देशद्रोह) आणि भादंवि कलम १२० (कटकारस्थान) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने कलम १२४ अ रद्द करण्याचे आश्वासन जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले होते. या कायद्याचा वेळोवेळी गैरवापर होत आला असून, तो रद्द केला गेला पाहिजे, असे काँग्रेसने त्यावेळी म्हटले होते. मात्र आता सरकार संकटात आल्यानंतर काँग्रेसकडून या कायद्याचा वापर नेते आणि मंत्र्यांविरोधात करण्यात आला आहे.