प्रत्येक ७२ तासांनी भेटणार काँग्रेसचा टास्क फोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:29 AM2022-05-25T06:29:12+5:302022-05-25T06:29:40+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केला टास्क फोर्स
आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी टास्क फोर्सचे मंगळवारी गठन केले. प्रियंका गांधी, रणदीप सिंह सुरजेवाला, अजय माकन, जयराम रमेश, पी. चिदंबरम, मुकुल वासनिक व के. सी. वेणुगोपाल यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात टास्क फोर्स २०२४ची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. हा टास्क फोर्स विधानसभा निवडणुकीपासून व लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व रणनीती ठरवणार आहे. त्यात माध्यमे, वित्तीय, निवडणूक व्यवस्थापन, संघटनेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
टास्क फोर्सचे हे सर्व नेते सामूहिक निर्णय घेणार नसून, या नेत्यांमध्ये कामाचे वाटप केले जाईल व सर्वांना एक-एक विभाग देऊन टीमही दिली जाणार आहे. हा टास्क फोर्स प्रत्येक ७२ तासांनी भेटून पक्षाशी संबंधित सर्व समस्यांवर तोडगा काढून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला अहवाल सुपूर्द करणार आहे.
शिबिरात घेतले हाेते निर्णय
या महिन्यात उदयपूर नवसंकल्प शिबिरात सर्व अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार, राजकीय समिती, टास्क फोर्स व ‘भारत जोडो पदयात्रा’ समितीची आज स्थापना करण्यात आली.
वित्तीय, निवडणूक व्यवस्थापन इत्यादी मुद्द्यांवर निर्णय घेणार