नवी दिल्ली- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तेलंगणा असं एकमेव राज्य आहे, जिथे जुनंच सरकार पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेस सत्तारूढ होणार आहे. राजस्थानमध्येही काँग्रेस 199 जागांपैकी 99 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे अपक्षांच्या मदतीनं काँग्रेस लवकरच सत्ता स्थापन करेल. अशातच या हिंदी पट्ट्यातील राज्यांना काँग्रेस कोणते तीन नवे मुख्यमंत्री देते, याचाही आढावा घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया दोघांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजलं जातंय. तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोघांपैकी कोणाला तरी मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.
- कोणाला मिळणार राजस्थान ?
राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोन्ही नेते आपापल्या प्रभागांत लोकप्रिय आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही स्वतःच्या विभागातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले आहेत. त्यामुळेच दोघांचाही मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचं तरुण नेतृत्व आहे. त्यांनी राज्यात पक्षाला चांगली उंची मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षानं अजमेर आणि अलवर या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. गेहलोत यांनी यापूर्वीही राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही गेहलोत यांनी मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हे राहुल गांधी ठरवतील, असं म्हटलं होतं. काँग्रेस पक्ष मजबूत करणं हा माझा उद्देश असल्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे राहुल गांधी स्वतःचे तरुण साथीदार असलेल्या पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवतात का, की गेहलोत यांना पुन्हा संधी देतात हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
- कमलनाथ किंवा सिंधिया, कोणाला मिळणार मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद?
मध्य प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिलं होतं. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचं वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढं मोठं यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
- छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी या नावांची चर्चा
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदासाठी चार नावांची चर्चा आहे. या भुपेश बघेल यांचं नाव सर्वात वर आहे. तर दुसरं नाव टी. एस. सिंहदेव यांचं आहे. 2013च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसनं सिंहदेव यांना विधिमंडळ नेता बनवलं होतं. काँग्रेसला एकसंध ठेवण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. तर तिसरं नाव ताम्रध्वज साहू यांचं आहे. मृदू स्वभावामुळे त्यांना सहसा काँग्रेसमधलं कोणीही विरोध करू शकत नाही. काँग्रेसमधल्या ओबीसी नेत्यांवर त्यांची चांगली पकड आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ते छत्तीसगडमधून एकमेव खासदार होते. तर चौथं नाव चरण दास महंत यांचं आहे. बहुसंख्याक समाजातील नेत्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे.