अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा अवधी उरला असताना सत्ताधारी भाजपला गटातटात विभागलेल्या काँग्रेसमध्ये खिंडार पाडण्यात यश येण्याची शक्यता आहे. अनेक आमदारांसह काँग्रेसचे डझनभर वरिष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.गुजरात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांत सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे भाजपला काँग्रेस आमदारांची ‘शिकार’ करण्याची आयती संधी मिळाली आहे. काँग्रेसचे अनेक आमदार पक्षाच्या नेत्यांवर कमालीचे नाराज आहेत. त्याचा फायदा भाजप उठविणार आहे. साधी महापालिकेची निवडणूक जिंकू न शकणाऱ्या लोकांची आज्ञा आम्ही सतत पाळू शकत नाहीत, असे एका वरिष्ठ काँग्रेस आमदाराने सांगितले. आपण आणि आपले सहकारी पक्ष बदलासाठी भाजपबरोबर चर्चा करीत असल्याचे त्यांनी मान्य केले. या ‘तोडफोड’ मोहिमेत सहभागी एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव हे काँग्रेस नेत्यांशी थेट वाटाघाटी करीत असून, या महिन्यातच काँग्रेसचे नेते फुटतील.>भाजपामध्ये जाण्यासाठी कोण आहेत उत्सुकवाघेला यांच्यासह त्यांचे आमदार पुत्र महेंद्रसिंह वाघेला, ज्येष्ठ आमदार आणि उद्योगपती बलवंतसिंह राजपूत, गोध्राचे आमदार आणि माजी मंत्री सी. के. रावलजी आदी काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. गोध्रा, जामनगर, साबरकांता आणि खेडा आदी जिल्ह्यांत भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष या जिल्ह्यातील तगड्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By admin | Published: June 07, 2017 12:17 AM