नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवरून वादविवाद होतोय हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीररीत्या खोटे बोलण्याची सवय असल्याचा आरोप केला. गुजरातमधील काँग्रेस सरकारने १९९४ मध्ये, तर केंद्राने २००० मध्ये मोदींच्या जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीत केला. तेव्हा मोदींकडे कोणतेही पद नव्हते, असे त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात सांगितले.
शाह म्हणाले की, मोदींच्या जातीचा २५ जुलै १९९४ रोजी गुजरातमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. तोपर्यंत मोदींनी एकही निवडणूक लढवली नव्हती. यानंतर गुजरात सरकारने त्यांची जात केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. अखेर २००० मध्ये केंद्रीय ओबीसी यादीत त्यांच्या जातीचा समावेश करण्यात आला. तेव्हाही मोदींकडे सत्तेचे कोणतेही पद नव्हते. ना ते खासदार होते, ना आमदार होते, ना सरपंच होते.
‘रामाशिवाय भारताची कल्पनाच नाही’ ‘रामाशिवाय भारताची कल्पनाच करता येत नाही. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा अभिषेक होण्याचा दिवस भारताला ‘विश्वगुरु’ बनण्याच्या मार्गावर आणेल’. शनिवारी लोकसभेत नियम १९३ अन्वये ऐतिहासिक श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामलल्ला यांचा अभिषेक या विषयावरील चर्चेत भाग घेताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, २२ जानेवारीचा दिवस इतिहासात १० हजार वर्ष स्मरणात राहील.
‘आज मला माझ्या भावना आणि जनतेचा आवाज इथे मांडायचा आहे. ज्या भावना न्यायालयीन कागदपत्रांमध्ये दफन झाल्या होत्या. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला आवाज आणि अभिव्यक्ती मिळाली, असे ते म्हणाले. सभागृहात आलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांपैकी एक म्हणजे राम जन्मभूमीशी संबंधित प्रस्ताव आहे’. २२ जानेवारीचा दिवस येणाऱ्या हजारो वर्षांसाठी ऐतिहासिक ठरला आहे, असे गृहमंत्री म्हणाले,