चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 05:54 AM2023-06-08T05:54:16+5:302023-06-08T05:57:14+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीत प्रदीर्घ भेट झाली.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांच्या अहवालाची दखल घेऊन महाराष्ट्राबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची तयारी केली आहे. याच शृंखलेत मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीत प्रदीर्घ भेट झाली.
रमेश चेन्निथला यांनी आपल्या अहवालात अशोक चव्हाण, बंटी पाटील व यशोमती ठाकूर यांच्या नावांचा उल्लेख केला होता. या अहवालात पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आले आहे की, बंटी पाटील व यशोमती ठाकूर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे संघटनेचे नेतृत्व सध्या तरी करू शकणार नाहीत. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याची गरज आहे.
अहवालात अशोक चव्हाण यांच्या नावाबाबत सल्ला देण्यात आला आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांच्याकडे संघटनेचा अनुभवही आहे. सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या नावावर सहमती होऊ शकते. परंतु राज्यात जेव्हापासून शिंदे सरकार आलेले आहे, तेव्हापासून अशोक चव्हाण यांच्याबाबत एक समस्या आहे. काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास काहीसा कमी झाला आहे. शिंदे सरकारच्या विश्वासमताच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे १२ आमदार पोहोचू शकले नव्हते. त्यात त्यांचेही नाव आहे. ते भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती त्यांच्या विरोधकांनी वारंवार दिल्ली नेतृत्वापर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे अशोक चव्हाण व काँग्रेस नेतृत्व यांच्यातील अंतर वाढले होते. आजच्या भेटीकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.