भोपाळ : मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत यावेळी भाजपला जबरदस्त झटका बसला आहे. आठ नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पाच ठिकाणी, तर भाजप केवळ तीन ठिकाणी विजयी झाला. विशेष म्हणजे गेल्या वेळी आठपैकी सात ठिकाणी भाजप विजयी झाला होता.गेल्या महिन्यात गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही ग्रामीण भागात काँग्रेसला, तर शहरी भागात भाजपला यश मिळाले होते. त्यापाठोपाठ आता मध्यप्रदेशातही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सिहोर या गृह जिल्ह्यातील सिहोर नगरपालिका व शाहगंजनगर ही नगर परिषद जिंकली. याशिवाय मंदसौर नगरपालिकेतही भाजप विजयी झाला. त्याचवेळी रतलाल लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर आपली विजयी आगेकूच चालू ठेवीत काँग्रेसने शाजापूर नगरपालिकेशिवाय भेडाघाट, ओरछा, धार जिल्ह्यातील धामनोद आणि सिधी जिल्ह्यात मझौली येथे विजय मिळविला. सिहोरमध्ये भाजपच्या अमिता अरोरा यांनी ७५२३ मतांनी विजय मिळविला. नगरसेवक पदासाठी झालेल्या ३५ वार्डांतील १९ वार्ड भाजपने जिंकले. येथे काँग्रेस फक्त तीन वार्डांत विजयी झाली. सिहोरच्या शाहगंज नगर परिषदेत मात्र काँग्रेसचा पराभव झाला. येथे सर्व १५ वार्डांत भाजपचे उमेदवार विजयी झाले.
स्थानिक संस्थांत काँग्रेस वरचढ
By admin | Published: December 27, 2015 1:26 AM