शीलेश शर्मा
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत राजकीय संन्यास मागे घेणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहे. कामत हे महत्त्वपूर्ण सहकारी असून पक्षासाठी काम करत राहतील. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच मार्ग शोधला जाणार असून अडचणी दूर केल्या जातील, असे काँग्रेसचे प्रवक्ते अजयकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.कामत यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केल्यानंतरही त्यांच्याकडील राजस्थान, गुजरातसारख्या महत्त्वपूर्ण राज्यांचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी कायम संपर्क चालविला असून पक्षनेतृत्वाने तूर्तास त्यांच्या कामकाजात फेरबदल करण्याचा हेतू स्पष्ट केलेला नाही.मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रभावावर अंकुश लावला जाऊ शकतो. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षनेतृत्वाकडे अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघू शकलेला नव्हता. त्यामुळेच कामत यांनी राजकीय संन्यासाचे पाऊल उचलल्याचे मानले जाते.लवकरच राहुल गांधींसोबत चर्चा....कामतांनी राजकीय संन्यासाची घोषणा करताच हादरलेल्या काँग्रेसने प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांना तत्काळ संकट दूर करण्याच्या कामी लावले मात्र कोणतीही ठोस निष्पत्ती न निघाल्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काही खास निकटस्थांकडे ही जबाबदारी सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच राहुल गांधी कामत यांच्याशी चर्चा करू शकतात. कामत यांनी राजी केले जाऊ शकते. राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चे काढू नयेत आणि आंदोलने करू नयेत, असे आवाहन गुरुदास कामत यांनी बुधवारी आपल्या समर्थकांना केले. (प्रतिनिधी)>कामत यांच्या घरवापसीसाठी आंदोलन गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय बदलावा आणि पक्षकार्यात सक्रीय व्हावे, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन केले. यावेळी कामत गटातील नेत्यांसोबतच निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे दुखावलेल्या नेत्यांनी हजेरी लावली. आमदार नसीम खान, जनार्दन चांदूरकर यांच्यासह माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मधू चव्हाण, कृष्णा हेगडे, अशोक जाधव, बलदेव खोसा आदी नेत्यांनी यावेळी आंदोलकांना संबोधित केले.