संसदेत काँग्रेसची भिस्त खरगे-चौधरींंवर; गांधींचा हस्तक्षेप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:36 AM2022-11-29T05:36:59+5:302022-11-29T05:39:37+5:30
सोनिया गांधी-राहुल गांधींचा हस्तक्षेप नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची काँग्रेस सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात आणि विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यात सक्रिय भूमिका असणार नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत गुंतल्याने राहुल गांधी पक्षाच्या संसद कामकाज व्यवस्थापनात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे ही जबाबादारी काँग्रेसचे नवे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी सांभाळणार आहेत.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसची नवी रणनीती पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे नवे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे सभागृहाच्या कामकाजाबाबत विरोधी पक्षांशी धोरणात्मक संवाद साधण्याची जबाबदारी सांभाळतील. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या राहतील, परंतु त्या सभागृहात पक्षाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करणार नाहीत. काँग्रेस कशा पद्धतीने सामोरे जाणार याकडे लक्ष लागले आहे.
शुक्ला यांची भूमिका महत्त्वाची
राज्यसभेत काँग्रेसचे नवे नेते म्हणून निवडून आलेले राजीव शुक्ला हे आगामी हिवाळी अधिवेशनात खरगे यांच्यासोबत पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शुक्ला यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध असल्याने त्यांची खर्गे यांना मोठी मदत होणार आहे. लोकसभेतील काँग्रेसची जबाबदारी अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, मनीष तिवारी आणि कोंडिकुनिल सुरेश यांच्यावर येऊ शकते.
जयराम रमेश, दिग्विजय सिंह यांची अनुपस्थिती
राहुल गांधींसोबतच काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद जयराम रमेश आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही हिवाळी अधिवेशनातील बहुतांश दिवस सभागृहात उपस्थित राहणार नाहीत. दोन्ही नेत्यांचा भारत जोडो यात्रेत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेसला संसद कामकाज व्यवस्थापन आणि इतर विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यासाठी इतर नेत्यांची गरज भासणार आहे.
हिवाळी अधिवेशन२९ डिसें.पर्यंत चालणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन
७ डिसेंबरपासून
सुरू होणार आहे,
तर २९ डिसेंबर
रोजी संपणार आहे. या अधिवेशनात
१७ बैठका होणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत. यादरम्यान महत्त्वाच्या तारखांचा तपशीलही जारी करण्यात
आला आहे.