काँग्रेसकडून सत्तेसाठी धर्माचा वापर; कर्नाटकात राजनाथसिंहांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:32 AM2023-04-27T09:32:08+5:302023-04-27T09:40:47+5:30
कर्नाटकात राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका
बेळगाव : काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी धर्माचा वापर केला, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. बेळगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताच्या इतिहासात जर असा कोणताही राजकीय पक्ष असेल ज्याने सत्तेत येण्यासाठी धर्माचा आधार घेतला असेल तर तो काँग्रेस आहे. कर्नाटकात धार्मिक आधारावर चार टक्के आरक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. केवळ अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुस्लीम किंवा ख्रिश्चन यांना आरक्षणाचा लाभ मिळाल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. परंतु, भारताचे संविधान धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी देत नाही. तुम्हाला जात, पंथ आणि धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करायचे आहे का, असा सवाल
त्यांनी केला.
रेस्टॉरंटमध्ये प्रियांका गांधी यांनी बनविला डोसा
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी कर्नाटकातील त्यांच्या व्यस्त निवडणुकीच्या कार्यक्रमातून वेळ काढून येथील रेस्टॉरंटमध्ये डोसा कसा बनवितात हे शिकून घेतले.
धर्मावर आधारित आरक्षण असंविधानिक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी कर्नाटकमधील पहिल्या सभेत धर्मावर आधारित आरक्षणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आणि ते संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगितले. डबल इंजिन सरकारमुळे गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही, असा दावाही त्यांनी केला.
भाजप घोडेबाजार करत सरकार स्थापण्यात तरबेज
खरगे म्हणाले, राज्यात एकजुटीने काम केल्यास १५० जागा येऊन मजबूत असे काँग्रेस सरकार सत्तेवर येईल. भाजपने नेहमी कमी बहुमत मिळाले तर आमदारांना ईडी, सीबीआयचा धाक व पैशांचा घोडेबाजार करून खरेदी करून सरकार स्थापन केलीत. अशाच पद्धतीने महाराष्ट्र, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांत भाजपचे सरकार बनले आहे.