भोपाळ - मध्य प्रदेशातील 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या प्रचार दौऱ्यांना गर्दी होत आहे. नेते मंडळींच्या सभांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या झडलेल्या फैरी ऐकण्यासाठीही मतदार एकत्र येत आहेत. यावरुन भाजपा नेते आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजापा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या सभेदरम्यान, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर, ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल करत स्पष्टीकरण दिलंय.
काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. कार्यकर्त्यांना तत्काळ या शेतकऱ्यास रुग्णालयात दाखलही केले होते. मी सभास्थानी पोहोचल्यानंतर मला या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यावेळी, सर्वप्रथम मी अन्नदाता शेतकऱ्यांस श्रद्धांजली वाहत मौन धारण केले. माझ्यासाठी राजकारण हे समाजसेवेचं माध्यम आहे, आणि त्यासाठी मला काँग्रेसकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, अशा शब्दात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.