हिंदू सेनेने जामनगरमध्ये बसवलेल्या नथुराम गोडसेच्या पुतळ्याची जामनगर काँग्रेसचे अध्यक्ष दिगुभा जडेजा आणि त्यांच्या साथीदारांनी मंगळवारी सकाळी तोडफोड केली. मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हा पुतळा पाडला. कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ्याभोवती भगवे कापड लावून तो तोडला आहे.
हिंदू सेनेने ऑगस्ट महिन्यामध्ये जामनगर परिसरात नथुराम गोडसेचा पुतळा बसवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर संस्थेने ‘नथुराम गोडसे अमर रहे’चा नारा देत हनुमान आश्रमात तो उभारला होता. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. तसेच दुसरीकडे हिंदू महासभेने हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीपासून नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याचे म्हटले आहे, जिथे त्याला १९४९ मध्ये फाशी देण्यात आली होती. उजव्या विचारसरणीच्या संघटनेने सोमवारी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.