९ मे रोजी सभा : राहुल गांधी करणार हल्लाबोल
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ९ मे रोजी वाराणशीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मोदींनी अमेठीत राहुल गांधींना लक्ष्य बनविल्याने त्यांना थेट टक्कर देण्याचा निर्णय राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतला आहे. मोदींनी अमेठीत गांधी कुटुंबावर वैयक्तिक टीका केल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मोदी आता खूप समोर गेले असून आता वाक्युद्ध थांबवत संघर्षविराम केला जावा यासाठी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल आणि प्रियंका आपल्यावर निर्णयावर ठाम असल्याचे या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी ९ मे रोजी वाराणशीत दाखल होतील. ते रोड शो करणार की प्रचारसभा घेणार ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मोदींच्याविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार असून काँग्रेसला अमेठीतील मोदींच्या प्रचारसभेचे रोखठोक प्रत्युत्तर कसे द्यायचे ते आम्हाला माहीत आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सोनिया गांधी, प्रियंकांच्या हजेरीची आशा... राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या वाराणशी दौर्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असली तरी अद्याप तसे स्पष्ट संकेत मिळाले नाहीत मात्र अखेरच्या टप्प्यात त्या प्रचार करू शकतात. प्रियंकांनी होकार दिल्यास त्या ९ मे रोजी राहुल गांधी यांच्यासोबत किंवा १० मे रोजी स्वतंत्ररीत्या वाराणशीत प्रचार करू शकतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे अजय राय यांच्या प्रचाराचे सूत्रसंचालन करीत आहेत. आनंद शर्मा, मोहन प्रकाश, मधुसुदन मिस्त्री, प्रमोद तिवारी यांच्यासह अनेक दिग्गज नेते ८ मे रोजी वाराणशीत दाखल होतील. काही मुस्लीम नेत्यांना आधीच तेथे रवाना करण्यात आले आहे. बुद्धिजीवींच्या एका गटाला तेथे डेरेदाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.