Ahmed Patel son left Congress : दिल्ली काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठं अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अशात आता काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैजल अहमद पटेल यांनाही पक्षाचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात फैजल अहमद पटेल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "खूप दुःख आणि वेदनेने मी काँग्रेससाठी काम करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा एक कठीण प्रवास होता. माझे दिवंगत वडील अहमद पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश, पक्ष आणि गांधी कुटुंबासाठी समर्पित केले."
"मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक पावलावर मला नकार मिळाला. मी शक्य तितक्या मार्गाने मानवतेसाठी काम करत राहीन. काँग्रेस पक्ष नेहमीच माझा परिवार राहील. तसेच, मला पाठिंबा देणाऱ्या सर्व काँग्रेस नेत्यांचे, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे मी आभार मानतो", असे फैजल अहमद पटेल यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.
यापूर्वीही फैजल अहमद पटेल यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. जवळपास दोन वर्षांपूर्वी आपल्या राजकीय भविष्याबद्दल फैजल अहमद पटेल म्हणाले होते की, "वाट पाहून थकलो आहे, परंतु काँग्रेस नेतृत्वाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे माझे काही पर्याय खुले ठेवले आहेत."
कोण होते अहमद पटेल?अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे दीर्घकाळ राजकीय सल्लागार होते. तसेच, त्यांची काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख होती. अहमद पटेल यांचे २५ नोव्हेंबर २०२० रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. ते १९९३ पासून सलग पाच वेळा गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य होते. तत्पूर्वी अहमद पटेल हे १९७७, १९८० आणि १९८४ मध्ये सलग तीन वेळा गुजरातच्या भरूच लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते.