P Chidambaram, Congress vs BJP: पाटणा येथे विरोधी पक्षांच्या आघाडीची एक मोठी बैठक काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट झाला. अजित पवार यांनी काही आमदारांच्या साथीने शरद पवारांच्या विचारांशी फारकत घेत, शिवसेना-भाजपाच्या सत्तेत प्रवेश केला. आता बंगळुरू येथे विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी रविवारी एक मोठं विधान केलं. "२०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांची एकजूट करून जी आघाडी तयार होत आहे, त्याचा प्रमुख चेहरा 'योग्य वेळी' उदयास येईल.
आम आदमी पक्षावर साधला निशाणा
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम म्हणाले, "आम आदमी पक्षाने (आप) ज्या प्रकारे पाटणा येथील बैठकीत दिल्ली अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित केला, तो 'दुर्दैवी' होता. प्रत्येक मुद्द्यावर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी योग्यतेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षांची अनेक समान उद्दिष्टे आहेत. कारण ते भाजप सरकारच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या विरोधात आहेत. आर्थिक मंदी, वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी तसेच 'नागरिक स्वातंत्र्य कमी करणे' याबद्दल सारेच चिंतित आहेत. प्रसारमाध्यमांवरील दबाव, संस्था कमकुवत होणे आणि तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दलही सारेच चिंतेत आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे, पण असे असले तरी 'यावेळी त्याबद्दल बोलण्याची गरज नाही'. योग्य वेळी विरोधी पक्षाचा प्रमुख नेता कोण असेल, ते चित्र स्पष्ट होईल," असे विधान चिदंबरम यांनी केले.
गेल्या काही महिन्यांपासून, राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या एकजूटीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा सूर काँग्रेसकडून लावण्यात आला होता. तर, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याकडे या आघाडीचे नेतृत्व दिले जावे, असे काही पक्षांच्या नेतेमंडळीचे मत होते. पण राष्ट्रावादीतच फुटीची चिन्हं दिसल्याने आता, काँग्रेसनेही सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्य नेता कोण, या वादावर सध्या बोलणं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी बोलणं टाळल्याचे दिसत आहे.
'विरोधी पक्षांच्या जितक्या जास्त बैठका तितक्या चांगल्या'
चिदंबरम म्हणाले, "त्यांना सीमेवरील सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल देखील चिंता आहे आणि या सामायिक चिंतेने सर्व पक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र केले आहे. निवडणुका लक्षात घेता शक्य तितक्या वेळा सभा घेण्यास विरोधी पक्षांकडे पुरेशी कारणे आहेत. बेंगळुरू येथे होणारी बैठक निश्चितच उद्देशपूर्ण असेल. आम्हाला धीर धरावा लागेल आणि पुढील पावले काय टाकावी याचा शांतपणे विचार करावा लागेल."