ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल, राजीव शुक्ला, मोतीलाल व्होरा आणि आनंद शर्मा आज दुपारी गृहमंत्री राजनाथ सिंग यांची घेणार भेट घेणार असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करणार आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळ भाषेत लिहीलेल्या एका निनावी पत्राद्वारे राहुल गांधींना ही धमकी देण्यात आली असून ४ मे रोजी पाँडेचेरी येथून हे पत्र पोस्ट करण्यात आले होते. युपीएच्या कार्यकाळात मंत्री असलेले व्ही. नारायणस्वामी यांना हे पत्र पाठवण्यात आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे राहुल गांधी उद्या ( १० मे ) एका सभेसाठी कराइकल येथे जाणार आहेत.
पाँडेचेरी येथील सर्व उद्योगधंदे बंद पडण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला असून कराइकल येथील सभेदरम्यान राहुल गांधींना उडवण्यात येईल, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.