नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोल आल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजली आहे. जर एक्झिट पोलची आकडेवारी प्रत्यक्ष निकालात खरी ठरली तर ईव्हीएम मशिनमध्ये गडबड झाली असल्याची शक्यता आहे. तसेच एक्झिट पोलच्या एकतर्फी निकालांवर आमचा भरोसा नसल्याचं काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी सांगितले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागले तर ज्या राज्यात काँग्रेस जिंकली ते फक्त भाजपाचं षडयंत्र होतं असा आरोप त्यांनी केला. या तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ज्या कंपन्यांनी सर्व्हे करुन एक्झिट पोल दिले आहेत त्या कंपन्यांचे स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा त्यात या संस्था निपक्षपाती सर्व्हे करत नसल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राशिद अल्वी यांच्याप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक एक्झिट पोलमधून काँग्रेसचा पराभव होईल असं वर्तविण्यात आलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला याचे परिणाम सगळ्यांनी पाहिले असं त्यांनी सांगितले आहे.
ज्याप्रकारे एक्झिट पोलमध्ये आकडेवारी दाखविण्यात आली आहे तशी शक्यता फार कमी आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत 2004 मध्ये एक्झिट पोल दाखविले होते. 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. त्यामुळे 23 मे पर्यंत वाट पाहावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.