अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा जो धडाका लावला होता, त्याला चांगले यश आले असल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी २७ ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. त्यापैकी १८ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.राहुल गांधी यांनी द्वारकेतील द्वारकाधीश मंदिरापासून देवदर्शन सुरू केले. मात्र द्वारकेमधून भाजपाचे पाबुभा मानेक सलग सातव्यांदा विजयी झाले. याशिवाय राहुल यांनी अंबाजी मंदिर (दंता), बहुचराजी माता मंदिर (बेचरजी), चामुंडा माता मंदिर (चटिला), स्वामिनारायण मंदिर (गधाडा), अक्षरधाम मंदिर (उत्तर गांधीनगर), वीर माया मंदिर (पाटण), सोमनाथ मंदिर, उमिया माता मंदिर (उंझा), शामलाजी मंदिर (भिलोडा), रणछोडजी मंदिर डाकोर (थासरा), कबीर मंदिर (दाहोड), रणछोडजी मंदिर (पेटलाड), उनाय माता मंदिर (वनसाडा), खोडियार माता मंदिर व सदाराम बापा मंदिर (राधनपूर), देव मोग्रा माता मंदिर (देदियापाडा) आणि वलिनाथ मंदिर (वाव) या मंदिरांना भेट दिली.ही मंदिरे ज्या मतदारसंघांमध्ये आहेत, त्या १८ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यापैकी १२ पैकी १0 जागांवर २0१२ साली भाजपाने विजय मिळवला होता. राहुल गांधी यांच्या अहमदाबादमधील रोड शोला पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यामुळे ते तेथील प्रख्यात जगन्नाथ मंदिरात गेले. तेथील जमालपूर-खादिया मतदारसंघातूनहीकाँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. (वृत्तसंस्था)वाघेला यांच्या किल्ल्यात काँग्रेसने मारली बाजीनिवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडलेले शंकरसिंह वाघेला यांचा कापडगंज हा मतदारसंघ. तेथून ते २0१२ साली निवडून आले होते. पण या वेळी तेथून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. वाघेलांचा बालेकिल्ला ढासळला. आपणास मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करा, असा त्यांचा काँग्रेसमध्ये असताना आग्रह होता. पण काँग्रेसची त्यास तयारी नव्हती. त्यामुळेच त्यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा भाजपाने करून घेतला व नंतर वाघेलांना दूर सारले. त्यांनी पूर्वी भाजपाच्या नेतृत्वाला आव्हान देऊ न मुख्यमंत्रिपद मिळवले होते. नंतर काँग्रेसमध्ये जाऊ न त्यांनी केंद्रात मंत्रिपदही मिळवले होते. आता त्यांची स्थिती ‘ना घर के, ना घाट के’, अशी झाली आहे.मोदी यांनी भाजपा नेत्यांचे टोचले कान-गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा विजय मिळवला असला आणि तिथे सलग सहाव्यांदा भाजपा सरकार स्थापन करणार असले तरी गेल्या निवडणुकीपेक्षा १७ कमी जागा निवडून आल्याने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले असल्याचे भाजपाचे नेतेच सांगत आहेत.भाजपाला २0१२ साली ११६ जागी विजय मिळाला होता. तितक्या जागा तरी यंदा मिळाव्यात, अशी भाजपाची इच्छा होती. भाजपाने १५0 जागांचे लक्ष्य ठरविले होते. पण ११५ जागा मिळायलाच हव्यात, असा नेत्यांचा आग्रह व प्रयत्न होता. पण भाजपाला जेमतेम ९९ जागांवरच विजय मिळवता आला. म्हणजेच तीन आकडी संख्याही गाठता आली नाही. त्यामुळेच मोदी अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात आले.मोदी व शहा यांनी गुजरातमधील काही नेत्यांना मोबाइलवर मेसेजेस पाठवून सुनावले. त्यामुळे सत्ता मिळवल्याचा जल्लोष करू पाहणाºया नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. जल्लोष करताना जरा आत्मपरीक्षणही करा, असा इशारेवजा सल्लाच पंतप्रधानांनी भाजपा नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.मोदींच्या उंझामध्ये भाजपा पराभूत-वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव आहे आणि ते उंझा मतदारसंघात येते. त्या ठिकाणी काँग्रेसच्या आशा पटेल यांनी भाजपाचे नारायण पटेल यांना पराभूत केले आहे. नारायण पटेल येथून १९९५ पासून सतत निवडून येत होते. या वेळी त्यांचा आशा पटेल यांनी तब्बल २0 हजार मतांनी पराभव केला. उंझामधून आतापर्यंत काँग्रेसचे उमेदवार १९६२ व १९७२ अशा दोनदाच निवडून आले होते, हे विशेष. पंतप्रधानांचे गाव असलेल्या मतदारसंघातील पराभव भाजपा नेत्यांना खूपच लागला आहे.पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या काळात जे १४ जण पोलीस गोळीबारात ठार झाले, त्यापैकी एक जण उंझामधील होता. तेव्हापासून तिथे भाजपाविषयी राग होता. त्यामुळेच तेथे झालेल्या नगरपालिका निवडणुकाही भाजपाने पक्षातर्फे लढवण्याचे टाळले होते. विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपाचे मोठे नेते तेथे प्रचाराला गेले नाहीत. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी तेथे जाण्याचे टाळले होते. राहुल गांधी यांनी मात्र त्या भागात जाहीर सभा घेऊ न, मोदी यांच्या प्रचारावर कडाडून टीका केली होती.
राहुल गांधी यांच्या मंदिर भेटींना यश, २७ पैकी १८ ठिकाणी काँग्रेस विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:20 AM