ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 02:04 PM2018-03-10T14:04:22+5:302018-03-10T14:04:22+5:30
मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते.
नवी दिल्ली: २०१४ नंतर काँग्रेस पक्ष पंजाब आणि काही पोटनिवडणुकांचे अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाला आहे. नुकत्याच ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये नागालँड आणि त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवण्यात यश आले नाही तर मेघालयमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष झाला असला तरी मागील विधानसभेपेक्षा त्यांचे सदस्य घटले आहेत. घटत्या जागांबरोबरच काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारीसुद्धा ईशान्य भारतात घटल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे. मेघालय , त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड येथे काँग्रेसपक्षाला मिळणार्या मतांच्या टक्केवारीत २०१४ नंतर १३ टक्क्यांनी घट झाली आहे. काँग्रेसची मतांची ट्ककेवारी पूर्वी ३८.१% होती तो २४.७ टक्क्यांनी झाली आहे. तसेच विजयी झालेल्या जागांची सरासरी जवळपास निम्मी म्हणजे ३४.८ वरुन १९.५ टक्के इतकी झाली आहे.
२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यावर भारतीय जनता पार्टीला मात्र ईशान्य भारतात अच्छे दिन आले आहेत. या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत ईशान्य भारतात २३% इतकी वाढ झाली आहे. भाजपाला मिळणार्या मतांची ट्ककेवारी ३.९% इतकी होती ती आता २७% झाली आहे. भाजपाची विजयी होणार्या जागांची सरासरी १.५ वरुन २३.५ वर पोहोचली आहे यावरुन २००९-२०१४ या लोकसभेच्या पाच वर्षांपेक्षा २०१४-२०१९ या लोकसभेच्या काळात भाजपाला ईशान्य भारतात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होत आहेत तेव्हा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या समोर येतील.
मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. मतांच्या टक्केवारीत काँग्रेस गेल्या विधानसभेच्या वेळेस त्रिपुरात माकपानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता मात्र त्रिपुरात काँग्रेसला केवळ १.८% मते मिळाली आहेत. २०१३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला ३४.७% मते मिळाली होती.