Congress Vs RSS: प्रचारकांना विचारक देणार प्रत्युत्तर, संघाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसनं आखली खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:11 AM2022-04-20T11:11:58+5:302022-04-20T11:12:04+5:30
Congress Vs RSS: काँग्रेसने सेवादल या आपल्या जुन्या संघटनेला पुन्हा एकदा बळ देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांचा सेवादलाच्या विचारकांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी काँग्रेसने केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या प्रचारकांनी काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. वैचारिक लढाईमध्ये संघ आणि संघ प्रचारकांच्या आव्हानाचा सामना करताना अनेकदा काँग्रेसचे संघटन निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे काँग्रेसने सेवादल या आपल्या जुन्या संघटनेला पुन्हा एकदा बळ देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांचा सेवादलाच्या विचारकांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वी दोन वर्षे आधी सेवादलाची स्थापना झाली होती. मात्र संघ दिवसेंदिवस अधिक प्रबळ होत गेला. तर सेवादल काँग्रेसच्या राजकारणात केवळ औपचारिकतेपुरते उरले. सेवादलाकडे समृद्ध इतिहास आहे. मात्र सद्यस्थितीत सेवादलाकडे केवळ पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये शिस्त राखण्याची जबाबदारी उरलेली आहे. पण आता सेवादलाला गतवैभव प्राप्त करून देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे.
सध्या देशाच्या राजकारणात भाजपाचा राष्ट्रवादाचा अजेंडा शक्तिशाली बनत चालला आहे. तसेच त्याची लोकप्रियताही वाढत आहे. मात्र हा अजेंडा भ्रामक आणि दिशाभूल करणारा असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत असतो. आता संघाच्या या अजेंड्याला आव्हान देण्यासाठी सेवादलाला तयार केले जात आहे. सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई यांनी सांगितले की, सेवादल आता एका नव्या रूपामध्ये दिसून येईल. त्यासाठी प्राथमिक स्तरापर्यंत प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. हे प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावात जाऊन मोर्चा सांभाळतील. तसेच आम्ही प्रचारक नाही तर विचारक तयार करणार आहोत आणि आरएसएससारख्या संस्थ्यांच्या अजेंड्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असे सेवादलाचे पदाधिकारी सांगत आहेत.
सध्याच्या राजकारणात संघाच्या राष्ट्रवादाचा अजेंडा प्रबळ होत असल्याने काँग्रेसला सेवादलाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. काँग्रेसचे सेवादलही याचा उल्लेख स्वातंत्र्याची दुसरी लढाई असा करत आहे. दांड्याचा मुकाबला झेंड्याने आणि प्रचारकांचा मुकाबला विचारकांच्या माध्यमातून दिले जाईल, असे सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष हेमसिंह शेखावत यांनी सांगितले.