काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:58 PM2024-04-16T15:58:46+5:302024-04-16T15:59:24+5:30
कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. - गुलाम नबी आझाद
लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.
कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. आधी काँग्रेसमधील व्यवस्थेत बदल करण्यासाठी २३ नेते लढत होते. परंतु नेतृत्व काहीच ऐकत नव्हते. जेव्हा मुद्दे काढले गेले तेव्हा त्यांनी सांगितले होते की ते भाजपासोबत चर्चा करत आहेत. कधी कधी मला वाटते की काँग्रेसला स्वत:लाच भाजपा जिंकावी अशी इच्छा असेल, असे आझाद म्हणाले.
कोणताही पक्ष सत्तेत आला की त्याच्यासमोर गरीबी, बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख समस्यांचे आव्हान असणार आहे. निवडणूक धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर लढविली जाते, असे आझाद म्हणाले. डोडामध्ये प्रचार सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली.
या राजकारण्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये आग लावल्यानंतर सर्व नेते घाटी सोडून बाहेर स्थायिक झाले आहेत, अशी टीका आझाद यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वच राजकीय पक्षांवर केली.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये 19 एप्रिलला, जम्मूमध्ये 26 एप्रिलला, अनंतनाग-राजौरीमध्ये 7 मे रोजी, श्रीनगरमध्ये 13 मे रोजी आणि बारामुल्लामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.