आरक्षणासाठी काँग्रेस गंभीर नव्हती; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 09:26 AM2023-09-20T09:26:28+5:302023-09-20T11:54:48+5:30
विराधकांना सत्य पचविणे जातेय जड, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.
नवी दिल्ली : संसदेत महिलांना आरक्षण देण्याच्या विषयाबाबत काँग्रेस कधीच गंभीर नव्हती. या विषयाबाबत काँग्रेसने फक्त गप्पाच मारल्या अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
नारीशक्ती वंदन विधेयकासंदर्भात अमित शाह म्हणाले की, काँग्रेसमुळे महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात येऊ शकले नाही. काँग्रेसच्या मित्रपक्षांनी हे विधेयक सभागृहात कसे मांडले जाणार नाही याकडे अधिक लक्ष दिले. महिलांना आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक संसदेत मोदी सरकारने मांडल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला.
‘त्या’ क्षणाचा भाग बनल्याचा गर्व
सरकार ज्या क्षणी महिलांना भारताच्या भविष्यात समान वाटा देईल, त्या क्षणाचा आपण एक भाग असल्याचा गर्व वाटेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार खोलवर रुजलेली विषमता दूर करून आम्हा सर्व महिलांना भारताच्या भविष्यात समान वाटा देईल तेव्हा त्या क्षणाचा भाग बनल्याचा मला गर्व वाटेल, असे भाजप खासदार मनेका गांधी म्हणाल्या.
हे तर मोठे पाऊल
या निर्णयाचे स्वागत. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या कठीण राजकीय क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात साकार होणार आहे हे पाहून मला आनंद होत आहे. अर्धी लोकसंख्या असूनही आमचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे.
मेहबूबा मुफ्ती, अध्यक्ष, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी.
५० टक्के आरक्षण हवे
केंद्र सरकारने लोकसंख्या लक्षात घेऊन महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा विचार केला पाहिजे. आमच्या पक्षाला आशा आहे की, यावेळी चर्चेनंतर हे महिला आरक्षण विधेयक निश्चितपणे मंजूर होईल. - मायावती, अध्यक्ष, बसपा
विधेयकाचे स्वागत
महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आहे. मी उत्साहित आहे, मी खूप आनंदी आहे. पण, थोडी काळजीही आहे. त्याचे प्रारूप काय असेल. २००८ मध्ये राज्यसभेत मंजूर झालेले तेच विधेयक असेल का? के. कविता, विधान परिषद सदस्य, बीआरएस.
अमित शाह यांनी सांगितले की,
अमित शाह यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे हे या विधेयकाच्या निमित्ताने सर्वांना दिसून आले. मात्र, विरोधी पक्षांना हे सत्य पचविणे जड जात आहे. महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने श्रेय लाटण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या पक्षाची दुतोंडी भूमिका यापुढे लपून राहणे शक्य नाही.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अनेक सरकारे आली, त्यांनी प्रयत्ने केले, परंतु यश आले नाही. आता केंद्र सरकारने हे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी अनेक गोष्टी केल्या, त्यापैकी ही एक आहे. हे महिलांसाठी एक मोठे पाऊल आहे - ईशा गुप्ता, अभिनेत्री
हे विधेयक आमचे : सोनिया गांधी
महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या की, हे विधेयक आमचे आहे. संसद परिसरात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणले जात आहे. आपली ही मागणीही होती, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, हे विधेयक आमचे आहे.