संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:57 PM2024-04-16T15:57:13+5:302024-04-16T15:57:44+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघत आहे. यावेळी काँग्रेसह अनेक विरोधी पक्ष संविधान बदलण्याचा आरोप करत भाजपला निशाणा करत होते. भाजपच्या काही नेत्यांच्या विधानांवरून शंका उपस्थित करत तर्क लावत होते. मात्र आज बिहारमध्ये निवडणूक सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पूर्णिया आणि गया येथील सभेत संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांना पूर्णपणे घेरले. मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती.
तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना घाबरतो, ना झुकतो.
आणीबाणीवरही केलं भाष्य -
पूर्णियातील सभेला संबोधित करताना मोदींनी आणीबाणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, संविधान रद्द करण्याचे आणि संविधान ओलीस ठेवण्याचे काम या लोकांनी केले होते. सत्ता आणि सरकार एकाच कुटुंबाच्या हाती असावे, असे ज्यांना वाटते, त्यांच्या डोळात संविधान खुपते. एवढेच नाही तर, या लोकांनी आता घटनात्मक व्यवस्थेनुसार घेतल्या जात असलेल्या निवडणुकांचे निकाल नाकारण्याची धमकी द्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. संविधान हे दलित, मागास आणि आदिवासींची शक्ती बनून कायम राहावे, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे रहायचे आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.