Congress Whip To MPs: लोकसभा निवडणुकीनंतर कालपासून(दि.24) संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. भाजपने पुन्हा एकदा ओम बिर्लांना संधी दिली आहे, तर काँग्रेसकडून के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे. उद्या, म्हणजेच 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे.
काँग्रेसने खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "उद्या लोकसभेत एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जाईल. लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की, सकाळी 11 वाजल्यापासून सभागृह तहकूब होईपर्यंत सभागृहात उपस्थित राहावे." विशेष म्हणजे, भाजपनेही आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करुन बुधवारी लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक1952 नंतर पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. एनडीएच्या ओम बिर्ला यांच्यासमोर इंडिया आघाडीचे के. सुरेश आहेत. ही निवड बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. पण, विरोधकांची उपाध्यक्षपदाची मागणी भाजपने डावलल्यामुळे विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला आहे.