- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल करीत म्हटले होते की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नव्हे, तर राहुल गांधी यांचा स्टाफ सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेतो. गुलाम नबी आझाद यांच्यापूर्वी चौधरी बीरेंद्र सिंह, हेमंता बिसवा सरमा, आरपीएन सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, जयवीर शेरगिल, राव इंद्रजित, एस. एम. कृष्णा, नारायण राणे, भुवनेश्वर कलिता, प्रेमा खांडू, सुष्मिता देव, सुनील जाखड, कपिल सिब्बल, हार्दिक पटेल आणि संजय सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
राहुल गांधी यांच्या स्टाफमध्ये कोण व्यक्ती काय निर्णय घेतात? पीए अलंकार सवई : महाराष्ट्रातील रहिवासी आहेत आणि पूर्वी बँकेत काम करत होते. काँग्रेसचे अनेक नेते अलंकार यांच्यावर आरोप करीत आलेले आहेत की, ते आपल्या पसंतीच्या नेत्यांनाच राहुल गांधी यांच्या जवळ जाऊ देतात. त्यांची आपल्या पसंतीच्या नेत्यांची एक यादी आहे. अलंकार हे राहुल गांधी यांच्यासोबतच असतात. मग ते दिल्लीत असोत वा बाहेर एखाद्या दौऱ्यावर. कनिष्क सिंह : यांना राहुल गांधी यांचे मित्रही म्हटले जाते. २०१४ पासून राहुल यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे कनिष्क हे आजकाल काँग्रेसमधील मतभेदांकडे लक्ष ठेवून असतात. तसेच, राहुल यांच्याशी संबंधित कायदेशीर प्रकरणेही ते पाहतात. ते माजी राजनैतिक अधिकारी एस. के. सिंह यांचे चिरंजीव आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण तेच पाहतात.कौशल विद्यार्थी : हे विदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत. राहुल गांधी यांची भेट कोणाशी होणार आणि दौरे याचा कार्यक्रम कौशल हेच निश्चित करतात. असे सांगितले जाते की, ते फक्त कामाशी काम ठेवतात. ई-मेल, ट्विटर हँडल्सवरून ते रिप्लाय देतात.बायजू : हे एसपीजीमध्ये अधिकारी होते. २०१० मध्ये त्यांनी नोकरी सोडली. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची रूपरेखा तयार करणे हे बायजू यांचे काम आहे. काँग्रेस सध्या ज्या भारत जोडो यात्रेची तयारी करत आहे, याची जबाबदारी बायजू यांच्याकडे आहे. ते केरळातील आहेत. राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.