शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : ‘अब होगा न्याय’ हेच आगामी लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराचे घोषवाक्य असणार आहे. त्याचा संबंध केवळदेशातील सर्वात गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपयांची मदत देण्यापुरताच नाही, तर युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे, कृषिमालाला योग्य भाव मिळवून देणे, महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणे अशा अनेक बाबींशी आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी हे घोषवाक्य रविवारी जाहीर केले. स्टार्टअपसाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही, मोफत आरोग्यनिदान व उपचार, एका वर्षात २४ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार, १२वीपर्यंत मोफत शिक्षण, महिलांना ३३ टक्के आरक्षण, सुलभ जीएसटी पद्धती ही काँग्रेसची आश्वासने नमूद केलेली पोस्टर लावलेले हजारो ट्रक देशभर प्रचारासाठी फिरविण्यात येणार आहेत.
‘हिंदुस्थान को न्याय दिलायेंगे, काँग्रेस की सरकार बनायेंगे’असा नाराही प्रचारात दिला जाईल. केवळ ट्रकच्याच नव्हे, तर रेडिओ, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यांच्याद्वारेही काँग्रेस आक्रमक प्रचार करणार आहे.प्रचारगीतांत बदलकाँग्रेसच्या प्रचारमोहिमेची आखणी सिल्व्हर पुश या संस्थेने केली आहे. लोकसभा काँग्रेसची प्रचारगीते कवी जावेद अख्तर व निखिल अडवाणी यांनी लिहिली आहे. गीतांतील काही उल्लेखांबद्दल आयोगाने आक्षेप घेतले होते. त्यात गीतांमध्ये योग्य ते बदल काँग्रेसकडून केले आहेत.गेल्या पाच वर्षांतील कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्याचे मतदारांना आवाहनकरणे, हा आमच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असेल, असे भाजपने रविवारी जाहीर केले. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा कदाचित सोमवारी प्रसिद्ध केला जाईल, असे संकेतही पक्षाने दिले.केंद्रीय वित्तमंत्री व पक्षाचे प्रचार विभागाचे प्रमुख अरुण जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीत ‘फिर एकबार मोदी सरकार’ ही पक्षाच्या प्रचाराची टॅगलाइन असेल, असे सांगितले. जेटली यांनी पक्षाचे ‘थीम साँग’ व दृष्य प्रचाराचेप्रमुख साहित्य, तसेच प्रचारासाठी तयार केलेले व्हिडीओही जारी केले. याखेरीज मोबाइलवर रिंगटोन म्हणून वापरता येईल, असा छोटेखानी प्रचारी संदेशही पक्षाने तयार केला आहे.‘फिर से मोदी सरकार बनाते है, फिरसे कमल खिलाते है’, हेपक्षाचे प्रचारातील ‘थीम साँग,’ असेल असेही जेटली यांनी सांगितले. ‘आम्हाला ११ खेळाडू आणि ४० कर्णधार असलेले नव्हे, तर एकच कर्णधार असलेले सरकार हवे आहे,’ असे जेटली म्हणाले. भाजपने प्रचाराचे साहित्य बनविण्याचे काम एजन्सीला न देता ‘इन हाउस’ पद्धतीनेच केले आहे.