शीलेश शर्मा नवी दिल्ली : अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर पक्षाचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन राजधानीत होत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल. अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले जाईल. ते व्यवस्थितपणे होण्यासाठी राहुल यांनी अनेक समित्यांचे स्थापन केल्या आहेत.अधिवेशनातील प्रमुख समारंभासाठी ३१ सदस्यांची समिती बनवण्यात आली आहे. मोतीलाल व्होरा या समितीचे अध्यक्ष असून, संचालनाची जबाबदारी आॅस्कर फर्नांडिस यांच्यावर असेल. गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, कमलनाथ, जर्नादन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, मोहन प्रकाश यांच्यासह सर्व सरचिटणीस व राज्यांचे प्रभारी नेते समितीत असतील. विशेष निमंत्रित म्हणून अहमद पटेल, शीला दीक्षित, अजय माकन, शर्मिष्ठा मुखर्जी, अमित चावडा, कुलदीप बिष्णोई आदी नेत्यांना स्थान दिले आहे.अधिवेशनात मांडण्याच्या प्रस्तावांसाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ४४ सदस्यांची समिती आहे. मुकुल वासनिक तिचे संयोजक असतील. ए. के. एन्थनी हे राजकीय ठरावांच्या समितीचे प्रमुख असून, कुमारी शैलजा संयोजक आहेत. आर्थिक विषयांवरील प्रस्ताव तयार करण्यासाठी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, जयराम रमेश या समितीचे संयोजक असतील. परराष्टविषयक ठरावांसाठीच्या समितीचे अध्यक्षपद आनंद शर्मा यांच्याकडे असून, संयोजन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे असेल.घटनादुरुस्ती समिती-या अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेतही बदल केले जाणार आहेत, त्यांचे स्वरूप ठरवण्यासाठीच्या समितीचे प्रमुख गुलाम नबी आझाद आहेत. त्यांना जनार्दन द्विवेदी सहकार्य करतील. या समितीने मांडलेल्या घटनादुरुस्तीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल.ज्वलंत विषयांवर ठराव : शेतकºयांचे प्रश्न, बेरोजगारी, दुर्बल घटकांच्या समस्या आदी मुद्द्यांवर ठराव तयार करण्याचे काम भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समितीकेडे दिले आहे.
राष्ट्रीय अधिवेशनासाठी काँग्रेसची जोरदार तयारी, राहुल यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:48 AM