केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:41 PM2021-11-19T20:41:35+5:302021-11-19T20:42:14+5:30

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

Congress will celebrate Kisan Vijay Diwas across the country on Saturday will take out rally and candle march | केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

googlenewsNext

नवी दिल्ली-

केंद्र सरकारनं आज वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे आज मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता जनतेशी संवाद साधत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे आज रद्द झाल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झाल्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरात करणार असल्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. शनिवारी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं 'शेतकरी विजय दिवस' (Kisan Vijay Diwas) साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना २० नोव्हेंबरला शेतकरी विजय दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत ठिकठिकाणी रॅली आणि आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून कँडल मार्च आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रभारींना पत्र लिहिलं असून यात शेतकरी आंदोलन आणि त्यांचं बलिदान व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट होऊन केल्या गेल्या आंदोलनानंतर जाचक तीन कृषी कायदे रद्द केले गेले आहेत. आज सर्वांनी एकजुटीनं वाईटावर मात केली आहे आणि हे यश देशाच्या पोशिंद्याला समर्पित आहे, असं म्हटलं आहे. 

मोदींनी आज जनतेसमोर येत मागे घेतले कृषी कायदे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.

Web Title: Congress will celebrate Kisan Vijay Diwas across the country on Saturday will take out rally and candle march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.