कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर विधानसभा निवडणुका लढणार, उमेदवारांची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 09:08 AM2023-03-19T09:08:49+5:302023-03-19T09:09:13+5:30
कर्नाटक विधानसभेत २२४ सदस्य आहेत. काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे.
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे झाली. त्यावेळी या निवडणुकांत कोणाशीही युती न करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. काँग्रेस आपल्या ११० उमेदवारांची पहिली यादी येत्या सोमवारी जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) तसेच अन्य कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस युती करणार नसल्याचे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभेत २२४ सदस्य आहेत. काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे. विद्यमान आमदारांपैकी चार पाच जणांचा अपवाद वगळता अन्य आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. कर्नाटकमधील सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या मे महिन्यात संपत असून, त्याआधी विधानसभा निवडणुका होणे आवश्यक आहे. या निवडणुकांत काँग्रेस उमेदवारी देताना युवक व महिलांना प्राधान्य देणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. (वृत्तसंस्था)