नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यातील भाजपाकडे असलेल्या तीन राज्यांमध्ये सत्तांतर होऊ शकतं, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येऊ शकते, अशी सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी सांगते.मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. यातील 122 जागा जिंकत काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपाला 108 जागांवर समाधान मानावं लागेल. मात्र या दोन्ही पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मध्य प्रदेशात भाजपाला 41.5 टक्के, तर काँग्रेसला 42.2 टक्के मतं मिळतील. 2013 मध्ये मध्य प्रदेशात भाजपाला 166 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला 57 जागांवर यश मिळालं होतं. राजस्थानात भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागू शकतो, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यापैकी 142 जागांवर विजय मिळवत काँग्रेस राजस्थान पुन्हा काबीज करेल, असं सर्वेक्षणातून समोर आलेले आकडे सांगतात. तर भाजपाला 56 जागांवर यश मिळू शकतं. या दोन्ही पक्षांच्या मतदानाच्या टक्केवारीतही मोठा फरक असू शकतो. काँग्रेसला राजस्थानात 49.9 टक्के मतं मिळू शकतात, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. तर भाजपाला 34.3 टक्के मतं मिळू शकतात. छत्तीसगडमध्येही भाजपाचं कमळ कोमेजण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपाला 90 पैकी 40 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 47 जागांसह सत्ता स्थापन करता येऊ शकते. या राज्यात मध्य प्रदेशप्रमाणेच दोन्ही पक्षांच्या मतदानाची टक्केवारी जवळपास सारखी असेल, असं आकडे सांगतात. काँग्रेसला 38.9 टक्के, तर भाजपाला 38.6 टक्के मतं मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या छत्तीसगडमध्ये भाजपाचे 49, तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत.
Opinion Poll: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार; तीन राज्यांचा काँग्रेसला 'हात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 8:33 PM