नवी दिल्ली : स्वातंत्र्यकाळापासून बराच वेळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे. उद्योगपतींनी देणग्या देण्याकडे पाठ फिरविल्याने काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत मागण्याबरोबरच लोकांकडून देणगीही मागणार आहे. आता पक्षासाठी निधी जमविण्याची वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.
काँग्रेसचे खजिनदार अहमद पटेल आणि पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. देशात लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास सर्वच राज्यांत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. तसेच उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्यांनी काँग्रेसला देणग्या देण्यास हात आखडते घेतले आहेत. यामुळे काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून देणग्या गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ही एक चांगली योजना आहे. यामुळे पक्षाशी सामान्य लोकांचा संबंध येईल. सर्वांना आता समजले आहे की, उद्योजक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. तर काँग्रेस आधीपासून सामान्य लोकांसोबत आहे. जनतेकडून देणग्या मागण्यात काही चुकीचे नाही, असेही दुसऱ्या नेत्याने सांगितले.